इंद्रलोक अग्नितांडवात तीन निष्पापांचा बळी; कांदळवनातील अवैध झोपड्यांना कोणाचे अभय?

मंत्री प्रताप सरनाईक संतापले — आयुक्त, तहसीलदारांना सुनावले खडेबोल

भाईंदर : मीरा-भाईंदर शहरातील भाईंदर पूर्व येथील इंद्रलोक फेज-३ परिसरात काल रात्री सिलेंडर स्फोटातून उसळलेल्या भीषण आगीत तीन निष्पापांचा होरपळून मृत्यू झाल्याने शहर हादरले आहे. ही दुर्घटना केवळ अपघात नसून प्रशासनाच्या निष्काळजीपणा आणि भूमाफियांच्या बेकायदेशीर साम्राज्याचे भयावह रूप असल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी संताप व्यक्त केला.
घटनेची माहिती मिळताच मंत्री प्रताप सरनाईक यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या निष्पाप मुलांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करत त्यांनी शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळवून देण्याचा शब्द दिला. तसेच याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रस्ताव सादर करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
“प्रशासनाच्या ढिसाळपणामुळे सामान्य नागरिकांचे जीव जात असतील तर ते सहन केले जाणार नाही. इंद्रलोक परिसरातील अवैध साम्राज्य मुळासकट उखडून टाकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,” असा इशारा सरनाईक यांनी यावेळी दिला.
कांदळवनात अवैध वस्त्यांचा फैलाव
घटना घडलेला परिसर हा कांदळवन (मॅन्ग्रोव्ह) क्षेत्रात येत असून नियमानुसार येथे कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यास सक्त मनाई आहे. मात्र भूमाफियांनी कांदळवनाची कत्तल करून बेकायदेशीर झोपड्या उभारल्याचा आरोप करण्यात येत आहे. कमलेश गुप्ता नावाच्या व्यक्तीने येथे अवैधरित्या झोपड्या उभारून गरिबांकडून अव्वाच्या सव्वा भाडे उकळले, तसेच बेकायदेशीर बोअरवेल आणि वीज जोडण्या पुरवल्याची माहिती समोर आली आहे.
या भागात तब्बल २३ सिलेंडरचा स्फोट झाल्याचे समोर येत असून, येथे मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर कारभार सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.
आयुक्त-तहसीलदारांना फटकारले
घटनास्थळी उपस्थित अधिकाऱ्यांवर सरनाईक यांनी संताप व्यक्त केला.
“वारंवार तक्रारी करूनही प्रशासन झोपेत का होते? अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळेच तीन निष्पापांना जीव गमवावा लागला. याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन आहे,” अशा शब्दांत त्यांनी आयुक्त आणि तहसीलदारांना खडेबोल सुनावले.
तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि तात्काळ अवैध वस्त्यांवर बुलडोझर चालवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
घुसखोरीचा संशय; पोलिसांना सतर्कतेच्या सूचना
या दुर्घटनेत मृत झालेल्या व्यक्ती पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश येथील असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मात्र ते बांगलादेशी घुसखोर किंवा रोहिंगे असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने सरनाईक यांनी पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या.
मीरा-भाईंदर शहरात वाढणाऱ्या बेकायदेशीर झोपडपट्ट्यांची झाडाझडती घेऊन घुसखोरांवर तातडीने कारवाई करावी, असे आदेशही त्यांनी दिले.
इंद्रलोक येथील भीषण दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, आता तरी अवैध बांधकामांवर कडक कारवाई होणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *