जालना – सलग पाच वेळेस निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार राजेश टोपे यावेळेस सहाव्यांदा घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून उभे आहेत. मागील दोन वेळेस टोपे यांच्याकडून पराभूत झालेले डाॅ. हिकमत उढाण शिवसेनेच्या (शिंदे) वतीने पुन्हा तिसऱ्यांदा उभे आहेत. एकूण २३ उमेदवार मैदानात असलेल्या या मतदारसंघातून टोपे विजयाचा षटकार मारणार का ? हा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चिला जाणारा प्रश्न आहे. घनसावंगी मतदारसंघात आंतरवली सराटीसह आरक्षण आंदोलनातील गावे येत असल्याने जरांगे कोणाच्या बाजूने हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल, असे सांगण्यात येत आहे. गेल्या निवडणुकीत मताधिक्य घेताना टोपे यांची शेवटपर्यंत दमछाक झाली होती. परंतु काही शेवटच्या मतमोजणी फेऱ्यांमध्ये टोपे यांनी बाजी मारली. २०१९ च्या निवडणुकीत टोपे जेमतेम ३ हजार ४०९ मताधिक्याने विजयी झाले होते. यावेळेस गेल्या निवडणुकीप्रमाणे टोपे आणि उढाण, अशी सरळ लढत नाही. शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) माजी आमदार शिवाजीराव चोथे त्याचप्रमाणे मतदारसंघातील एका खासगी साखर कारखान्याशी संबंधित सतीश घाटगे अपक्ष म्हणून उभे आहेत. कावेरी बळीराम खटके (वंचित बहुजन आघाडी) तसेच दिनकर जायभाये (बहुजन समाज पार्टी) यांच्यासह अन्य उमेदवार उभे असल्याने या मतदारसंघात बहुरंगी लढत होत आहे. एकूण २११ गावे आणि साठ-पासष्ट वाड्या, वस्त्या आणि तांड्यांचा समावेश असलेला हा मतदारसंघ तीन तालुक्यांत विभागलेला आहे. अंबड ५१, जालना ४२ आणि घनसावंगी ११८ या प्रमाणे मतदारसंघातील गावांची संख्या आहे. गेल्या वेळेस झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत ज्या भागाने साथ दिल्याने टोपे निवडून आले होते, त्या भागातच म्हणजे अंबड तालुक्यातील उसाच्या पट्ट्यात यावेळेस अनेक उमेदवार उभे आहेत. अंबड तालुक्यातील पाथरवाला (बु.) हे टोपे यांचे गाव असून, या परिसरातीलच शिवाजीराव चोथे (शहागड), कावेरी खटके (वडिगोद्री) आणि दिनकर जायभाये (डुणगाव) हे उभे असलेले उमेदवार अंबड तालुक्यातीलच आहेत. या उमेदवारांचा टोपे यांना मिळणाऱ्या मतांवर किती परिणाम होऊ शकेल, हा या भागातील चर्चेचा विषय आहे. राज्यातील मराठा आरक्षण आंदोलनाचा केंद्र बिंदू असलेले आंतरवाली सराटी हे गाव याच मतदारसंघातील ऊस पट्ट्यातील आहे. मागील वेळेस टोपे यांना साथ देणाऱ्या भागातील हे गाव आहे. त्यामुळे मराठा समाजाची मते कुणाच्या बाजूने वळतात किंवा विभागली जातात हा प्रश्नही आहे. राष्ट्रवादीचे (शरद पवार) उमेदवार टोपे आणि शिवसेनेचे (शिंदे) उमेदवार उढाण हे दोघेही मराठा आहेत. ओबीसी आणि मुस्लिम मतदारांची संख्याही या मतदारसंगात लक्षणीय आहे. चोथे, खटके आणि जायभाये यांच्यासह अन्य काही उमेदवार ओबीसी प्रवर्गातील आहेत. जातीय समीकरणे काहीही असली तरी बहुतेक उमेदवार सर्वच जाती-धर्माच्या मतांच्या आशेवर असून, त्यादृष्टीने प्रचार यंत्रणा राबवित आहेत. बहुरंगी लढत आपल्या पथ्यावर कशी पडेल, यासाठी टोपे समर्थक प्रयत्नशील आहेत. टोपे यांच्याकडून केलेल्या विकास कामांचा मुद्दा प्रचारात आहे. विरोधकांकडून मात्र, टोपे यांनी विकास कामे केले नसल्याचा आरोप करण्यात येत असून, त्यांच्या अधिपत्याखालील साखर कारखान्याच्या राजकारणावरून टीका केली जात आहे.