मुंबई- मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते यांची बैठक झाली त्यात दोन-तीन अपवाद वगळले तर सर्व ठिकाणची बंडखोरी क्षमतेय. ४ नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा आहे. आम्ही तिन्ही पक्ष लढू, जिंकू आणि महाराष्ट्रावर महायुतीचा झेंडा फडकवू, असा विश्वास भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांनी व्यक्त केला.
दिवाळीच्या पहिल्या दिवशी भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडिंवर भाष्य केले.
काँग्रेसचे रवी राजा यांच्या भाजपा प्रवेशावर दरेकर म्हणाले की, रवी राजा हे केवळ काँग्रेसचे कार्यकर्ते किंवा नेते नाहीत. तर एक अभ्यासू अशा प्रकारचे विरोधी पक्षनेता म्हणून मुंबईकरांच्या प्रश्नावर मुंबई महापालिकेत त्यांची कारकीर्द गाजली आहे. लोकाभिमुख अशा प्रकारचे व्यक्तिमत्व आहे. कोणीतरी आले एवढ्या पुरता हा विषय सिमीत नसून एक विरोधी पक्षनेता आज काँग्रेसमधून भाजपात येतो हे प्रतिबिंब कशाचे आहे हे काँग्रेसने समजून घेण्याची गरज आहे. विरोधी पक्षनेत्यालाच आपल्या पक्षावर विश्वास नाही, भाजपावर विश्वास निर्माण होतो यावरून काँग्रेसमध्ये अनेक अशी लोकं आहेत जी भाजपाचे, महायुतीचे काम करणार आहेत आणि सरकार आणणार आहेत. आता विजय वडेट्टीवार येऊ नये. त्यांचीही काँग्रेसमध्ये घुसमट होतेय.
मनोज जरांगे पाटील यांच्या विधानावर बोलताना दरेकर म्हणाले की, जरांगेंनी सगळ्याच जागा लढवल्या पाहिजेत. त्यांचा हेतू पाडापाडीचा असेल तर त्याला मराठा समाज, मतदार दाद देणार नाही. लोकांना सकारात्मक राजकारण पाहिजेय. मराठा समाजाचे उमेदवार पाडायचे दुसऱ्या बाजूने ओबीसीतून आरक्षण द्या बोलायचे, इम्तियाज जलील यांना मिठ्या मारायच्या, हे मराठा समाजाला आवडत नाही. त्यांनी लढावे, जिंकावे यासाठी आमच्या शुभेच्छा असल्याचेही दरेकर म्हणाले.
तसेच जरांगे केवळ आता मराठा समाजाचा चेहरा होऊ पाहत नाही. मराठा समाजाने त्यांना नाव, लौकिक, चेहरा दिला. परंतु त्यांच्यात राजकारणाचे वारं भिनलेय, असे टिकास्त्र भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी सोडले आहे. तसेच जरांगे पाटील यांच्या भुमिका मराठा समाजासाठी ज्या पहिल्या होत्या त्या आता राहिलेल्या नाहीत. मराठा समाज ताकदीने महायुतीच्या मागे उभा राहील. निकालातून ते दिसून येईल, असा ठाम विश्वासही दरेकरांनी व्यक्त केला. सर्व पक्षांना, सर्व जातीधर्माना बरोबर घेऊन एक निधर्मवादी असा नेता म्हणून त्यांची छबी पुढे आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. जरांगेंनी आता समाजाच्या गोष्टी करू नयेत, राजकारण करावे आणि राजकीय पक्ष असतात तसे काम करावे, असा टोलाही लगावला.
दरेकर म्हणाले की, देवेंद्र फडणवीस एक संयमी नेते आहेत. राज्याचे लोकप्रिय, समंज्यस अशा प्रकारचे नेतृत्व आहे. जरांगेंना सांगितलेय व्यक्तिशः टार्गेट कुणाला, पक्षाला करू नका. तुम्ही समाजाची चळवळ चालवा आम्ही सोबत आहोत. परंतु व्यक्तिगत पक्षावर आणि फडणवीसांवर याल तर आम्हीही सहन करणार नाही, असा इशाराही दरेकरांनी जरांगे यांना दिला.