दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानविरुद्धचा पहिला टी-२० सामना ११ धावांनी जिंकत पाकिस्तानला पराभवाचा धक्का दिला. त्यांनी डर्बनमध्ये खेळलेला सामना ११ धावांनी जिंकला आणि यासह ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पण, दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा हिरो ठरला टीम बस चुकलेला खेळाडू. दक्षिण आफ्रिकेच्या ३३ वर्षीय अष्टपैलू खेळाडूने पाकिस्तान संघाच्या पराभवात मोठी भूमिका बजावली. दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू जॉर्डर लिंड याला या सामन्याचा सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. जॉर्जची टीम बस चुकली होती आणि डर्बनच्या मैदानावर तो पोलिसांच्या व्हॅनमधून पोहोचला होता. पण सामन्यात लिंडने फलंदाजी आणि गोलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी करत संघाला पहिल्याच सामन्यात विजय मिळवून दिला.
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ गडी गमावून १८३ धावा केल्या. ३० धावांत ३ गडी बाद झाल्यानंतरही दक्षिण आफ्रिकेला १८० पेक्षा मोठी धावसंख्या गाठता आली. या मोठ्या धावसंख्येचे श्रेय डेव्हिड मिलर आणि जॉर्ज लिंडं यांना जाते. मिलरने ४० चेंडूत ८ षटकारांसह ८२ धावा केल्या, ज्यात त्याचा स्ट्राइक रेट २०५ होता. त्याचप्रमाणे जॉर्ज लिंडनेही २०० च्या स्ट्राईक रेटने केवळ २४ चेंडूत ४८ धावा केल्या. त्याने खेळीदरम्यान ४ षटकार लगावले.डेव्हिड मिलरने त्याच्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ८वे अर्धशतक झळकावले. जॉर्ज लिंडने आपल्या टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सर्वात मोठी धावसंख्या केली. मिलरने ८२ धावा करत चांगल्या धावसंख्येचा पाया रचला. पण लिंड मात्र इतक्यावरच थांबला नाही तर त्याने चेंडूनेही कमाल केली. लिंडने गोलंदाजीतही आपल्या कारकीर्दीतील उत्कृष्ट कामगिरी केली.१८४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तान संघासाठी जॉर्ज लिंड दुस्वप्नासारखा ठरला. त्याने ४ षटकांच्या स्पेलमध्ये २१ धावा देऊन ४ विकेट घेतले, ही टी-२० क्रिकेटमधील त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीत सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल जॉर्ज लिंडला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. सामन्याचा हिरो बनल्यानंतर लिंडने सांगितले की, या कामगिरीद्वारे टी-२० इंटरनॅशनलमध्ये त्याचे स्वप्नवत पुनरागमन झाले आहे. त्याने स्वतःला दिलेले वचन त्याने पूर्ण केले याचा त्याला आनंद आहे, त्याने संघासाठी चांगली कामगिरी केली. याचदरम्यान, जॉर्ज लिंडने सांगितले की त्याची टीम बस चुकली होती, त्यानंतर पोलिसांनी त्याला मैदानावर सोडले.