भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात गकेबरहा येथे चार सामन्यांच्या मालिकेतील दुसरा टी-२० सामना खेळला गेला, ज्यामध्ये टीम इंडियाचा ३ विकेटने पराभव झाला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव निश्चित वाटत होता पण अखेरच्या षटकांमध्ये सामना बदलला. या सामन्यात हार्दिक पंड्याने असे काही केले ज्यामुळे तो बऱ्याच काळानंतर पुन्हा चाहत्यांच्या निशाण्यावर आला. हार्दिकने या सामन्यात अतिशय संथ खेळी खेळली, त्यामुळे भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्याने ४५ चेंडूंमध्ये चार चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने ३९ धावा करत नाबाद राहिला. पण तरीही हार्दिक पंड्या का ट्रोल होतोय?
चाहत्यांनी हार्दिक पंड्याला का टार्गेट केले?
भारताच्या डावाच्या १९व्या षटकात हार्दिक पंड्या आणि अर्शदीप सिंग क्रीजवर होते. गेराल्ड कोएत्झी हे षटक टाकत होता, त्याच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर एक धाव घेऊ शकला नाही. पण या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर अर्शदीपने एक धाव घेतली, त्यानंतर हार्दिक त्याला म्हणाला आता दुसऱ्या टोकावर उभा राहून मजा बघ. त्याचा अर्थ असा होता की आता मी स्वतःला स्ट्राइकवर ठेवेन आणि तू नॉन-स्ट्रायकर एंडवर राहून फटकेबाजी बघ. पण हार्दिक त्या षटकात केवळ २ धावा करू शकला. यानंचर षटकाच्या शेवटच्या चेंडूवर एकेरी घेत हार्दिकने स्ट्राइक स्वतःकडे ठेवली. शेवटच्या षटकातील पाच चेंडूत फक्त दोन धावा झाल्या. अखेर सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर हार्दिक पंड्याने चौकार लगावला. पण हार्दिक अर्शदीपला ज्याप्रकारे तो बोलला त्याप्रमाणे तो फलंदाजी करू शकला नाही आणि आता त्याला ट्रोल केले जात आहे. हार्दिकला सलग १० चेंडू खेळण्याचा संधी मिळाली होती पण यादरम्यान त्याने फक्त ६ धावा केल्या. यावरून चाहते पंड्याला चांगलंच सुनावत आहेत. अर्शदीप सिंगला संधी दिली असती तर त्यानेही एखादा मोठा फटका खेळला असता आणि मोठा फटका नाही तर पंड्याने एकेरी धावा घेत स्ट्राईक रोटेट करत ठेवणं गरजेचं होतं, असंही चाहत्यांचं म्हणणं आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी १२४ धावांचे आव्हान दिले होते. भारताने गोलंदाजीत चांगली कामगिरी केली आणि वरूण धवनने ५ विकेट्स घेत दक्षिण आफ्रिकेचे कंबरडे मोडले. पण अखेरीस शेवटच्या षटकांमध्ये सामन्याचा रोख बदलत ट्रिस्टन स्टब्सने शानदार खेळी करत संघाला १९व्या षटकातच विजय मिळवून दिला.