शंभू : हमीभावासह इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी दिल्लीकडे निघालेल्या आंदोलक शेतकऱ्यांचा मोर्चा शंभू सीमेवर अडवून पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला. यामध्ये आठ शेतकरी जखमी झाले असून शेतकऱ्यांनी हा मोर्चा दिवसभरासाठी स्थगित केला.पंजाब-हरियाणा सीमेवरील शंभूपासून दिल्लीकडे मोर्चा नेण्यासाठी १०१ शेतकऱ्यांनी शुक्रवारी सकाळी तयारी केली. मात्र काही मीटर अंतरावरच त्यांना हरियाणा सुरक्षा दलांनी टाकलेल्या बॅरिकेडमुळे थांबावे लागले. बॅरिकेडपर्यंत आंदोलक पोहोचल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर अश्रुधुराचा मारा केला आणि आंदोलकांना मागे जाण्यास भाग पाडले.
आंदोलक ‘सत्नम वाहेगुरू’च्या घोषणा देत होते. अनेक शेतकऱ्यांनी बॅरिकेडचा पहिला अडथळा सहज दूर केला. पण त्यानंतरचे अडथळे त्यांना दूर करता आले नाहीत. काही आंदोलक लोखंडी जाळ्या घग्गर नदीवर बांधलेल्या पुलाखाली ढकलताना दिसले. एक आंदोलक सुरक्षारक्षक थांबतात त्या ठिकाणी एका शेडवर चढला. त्याला जबरदस्तीने खाली उतरवण्यात आले. शंभू सीमेवर पाण्याचा मारा करणारी वाहनेही सुरक्षा रक्षकांनी तैनात केली होती.हरियाणा पोलिसांनी जमावबंदीच्या आदेशाचे आंदोलकांना स्मरण करून दिले आणि पुढे न जाण्यास सांगितले. या साऱ्या झटापटीत आठ शेतकरी जखमी झाल्याचा दावा शेतकरी नेत्यांनी केला. सर्वण सिंग पंधेर यांनी नंतर दिवसभरासाठी आंदोलन स्थगित केले.जखमी शेतकऱ्यांना रुग्णालयात नेण्यात आल्याचे सिंग यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजदूर मोर्चा आंदोलनाची पुढील दिशा ठरवतील, असे त्यांनी सांगितले.
हरियाणातील ११ गावांत इंटरनेट बंद
हरियाणा सरकारने सुरक्षेच्या स्थितीचा आढावा घेऊन खबरदारी म्हणून अंबाला जिल्ह्यातील ११ गावांतील इंटरनेट सेवा आणि मोबाइलवरील सामूहिक संदेश सेवा ९ डिसेंबरपर्यंत बंद केली. सरकारी आणि खासगी शाळांना सुट्टी देण्यात आली.