अवैध प्रवासी वाहतुकीवर कडक कारवाईचे आदेश; निष्क्रिय अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : राज्यात वाढत असलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीवर आळा घालण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे आणि अशा प्रकारांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. तसेच निष्क्रिय व जबाबदारी टाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
अवैध प्रवासी वाहतुकीस प्रतिबंध घालण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बांद्रा येथील परिवहन विभागाच्या कार्यालयात मोटार परिवहन विभाग आणि एसटी महामंडळाची उच्चस्तरीय आढावा बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील अवैध प्रवासी वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
बैठकीत सरनाईक यांनी स्पष्ट केले की, एसटी महामंडळाकडून उपलब्ध करून दिलेल्या वाहनांचा वापर केवळ कारवाईसाठीच करण्यात यावा. या वाहनांचा कोणत्याही प्रकारचा गैरवापर सहन केला जाणार नाही. तसेच आरटीओच्या सर्व ५९ कार्यालयांना आवश्यक संसाधने उपलब्ध करून देण्यासाठी एसटीने तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
याशिवाय प्रत्येक संयुक्त कारवाईचा फोटो आणि लेखी अहवाल मुख्य कार्यालयात सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. संबंधित अधिकारी कारवाईत निष्क्रिय राहिल्यास किंवा जबाबदारी टाळल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले.
राज्यात वाढत्या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम होत असून प्रवाशांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे या प्रकारावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी कठोर पावले उचलण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्र्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *