अर्धा समुद्र भावाच्या मतदारसंघात, स्वच्छ करणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर अमित ठाकरेंचं लागलीच उत्तर, म्हणाले…

Spread the love

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पहिल्या ४५ जणांच्या नावांच्या यादीत राज ठाकरे यांनी त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनाही निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. माहीम विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे निवडणूक लढवणार असून त्यांच्यासाठी सर्वांत मोठी समस्या समुद्र किनाऱ्यांची अस्वच्छता असल्याचं त्यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. तसंच, निवडून आल्यानंतर मी सुरुवातीचे काही दिवस फक्त माहिमकरांसाठी ठेवणार असल्याचंही ते म्हणाले. अमित ठाकरे यांनी समुद्र किनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी कायम विविध मोहिमा राबवल्या आहेत. अर्धा समुद्रकिनारा भाऊ आदित्य ठाकरेच्या मतदारसंघात येतो असा प्रश्न पत्रकारांनी आज अमित ठाकरेंना विचारला. “तोही समुद्रकिनरा स्वच्छ करून देऊ. तो हो म्हणाला तर तेही स्वच्छ करून देईन”, अशी तत्काळ प्रतिक्रिया अमित ठाकरे यांनी दिली.

निवडून आल्यावर सर्वांत पहिला कोणता प्रश्न सोडवणार? असं विचारल्यावर अमित ठाकरे म्हणाले, “माझ्यासाठी वैयक्तिक समुद्रकिनारा हा पहिला प्रश्न आहे. मुंबईतील समुद्र किनाऱ्यांवर जावंसं वाटत नाही. बाहेरगावी अनेक समुद्रकिनाऱ्यावर गेलोय. तिथे काय शांतता मिळते हे मला माहिती आहे. त्यामुळे मुंबईकरांनाही असंच पिस ऑफ माईंड मिळण्याकरता समुद्र स्वच्छ असायला हवेत. त्यामुळे मी निवडून आल्यावर माहिमच्या पर्यावरणाचा प्रश्न नक्कीच सुटेल. आणि २३ नोव्हेंबरला आम्ही सत्ते बसल्यावर इतर प्रश्नही सुटतील”, असं सूचक विधानही त्यांनी केलं.

उमेदवारी मिळाल्यानंतर काय वाटलं?

“उमेदवारी मिळाल्यानंतर आत्मविश्वास नक्कीच आहे, पण ज्यावेळी यादीत माझं नाव आलं, त्यावेळी पोटात थोडा गोळा आला. कारण आता आयुष्य बदलणार आहे. आता शासकीय पदाचे ओझं राहणार आहे. पण ते ओझं पेलायला मी तयार आहे”, असं अमित ठाकरे म्हणाले. पुढे बोलताना, मी लहानपणीपासून या मतदारसंघात वाढतो आहे. माझ्या वडिलांचा आणि आईचा जन्मही याच मतदारसंघातला आहे. त्यामुळे इथल्या तीन पिढ्यांना आम्ही जवळवून बघितलं आहे. त्यांचा परिचय आहे. मी पक्षकार्यालयात जाताना अनेकदा पायी चालत जातो, तेव्हा लोक मला भेटतात, त्यांच्याशी चर्चा होते, त्यांच्या अनेक समस्या आम्ही सोडवतो. त्यामुळे मतदारसंघातील मतदार माझ्या पाठिशी उभी राहील, अशा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *