मीरा भाईंदर : मीरा-भाईंदरसाठी महत्त्वाची ठरणारी दहिसर–काशिगाव मेट्रो सेवा ७ एप्रिलपासून सुरू करण्याची तयारी सुरू असली, तरी अपूर्ण कामांमुळे वंचित बहुजन आघाडीने प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर नाराजी व्यक्त केली आहे. सर्व कामे पूर्ण करूनच मेट्रो सुरू करावी, तसेच १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने मेट्रोचे लोकार्पण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.त्याबाबत चे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे. मिरागाव, काशिगाव आणि पेणकरपाडा मेट्रो स्थानकांवरील अनेक कामे अद्याप अपूर्ण असल्याचे दिसून येत आहे. तसेच पार्किंगसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव स्पष्टपणे जाणवत आहे. काशिगाव मेट्रो स्टेशन परिसरात आधीपासूनच वाहतूक कोंडीची समस्या गंभीर असून मेट्रो सुरू झाल्यानंतर वाहतुकीचा ताण वाढून अपघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष इक्बाल महाडिक आणि पदाधिकाऱ्यांनी काशिगाव व मिरागाव मेट्रो स्थानक परिसराची पाहणी केली. यावेळी अपूर्ण कामे आणि मेट्रो लोकार्पणाच्या श्रेयवादावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. प्रवाशांच्या सुविधा आणि सुरक्षेबाबत योग्य उपाययोजना केल्याशिवाय मेट्रो सुरू करू नये, असा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला.
तसेच घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी म्हणजेच १४ एप्रिल रोजीच मेट्रो सेवा नागरिकांसाठी सुरू करावी, असे आवाहन मुख्यमंत्री यांना करण्यात आले आहे.
मेट्रोमुळे प्रवास सुलभ होणार असला, तरी नागरिकांच्या सुरक्षेशी तडजोड होणार का, असा प्रश्न उपस्थित होत असून या मागणीमुळे मेट्रो लोकार्पणाबाबत आता प्रशासन काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.