‘अदाणींना अटक करा’, राहुल गांधींच्या मागणीनंतर लोकसभेत गोंधळ; काही वेळेसाठी कामकाज तहकूब

Spread the love

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे. सकाळी लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज सुरू होताच काँग्रेसने अदाणी समूहाशी संबंधित भ्रष्टाचार आणि लाचखोरीचे प्रकरण उचलले. तसेच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गौतम अदाणी यांना अटक करण्यात यावे, अशी मागणी लावून धरली. यावेळी काही खासदारांनी स्थगन प्रस्तावाचा मुद्दाही रेटला. तर समाजवादी पक्षाने संभल येथे झालेल्या जातीय हिंसाचाराचा मुद्दा पुढे करण्याचा प्रयत्न केला. विरोधकांचा गोंधळ सुरू असतानाच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. पण विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे काही काळ कामकाज स्थगित करावे लागले.

राहुल गांधी काय म्हणाले?

लोकसभेचे विरोधी पक्षनेते यांनी लोकसभेत बोलताना संविधानावर दोन दिवस चर्चा करण्याची मागणी केली. हीच मागणी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभेतही केली. तसेच संसदेबाहेर आल्यानंतर राहुल गांधींनी माध्यमांशी बोलताना गौतम अदाणी यांच्यावर टीका केली. अमेरिकेच्या न्यायालयात अदाणी समूहावर लाचखोरीचे आरोप ठेवण्यात आले आहेत, ते आरोप आज अदाणी समूहाने फेटाळून लावल्याची बातमी आली आहे. यावर बोलताना राहुल गांधी म्हणाले, “साहजिकच अदाणी काय आरोप स्वीकारणार आहेत का? ते आरोप फेटाळणारच. प्रश्न हा आहे की? त्यांना अटक झाली पाहीजे आणि या प्रकरणाशी निगडित इतरांनाही ताब्यात घेतले पाहीजे. अमेरिकेच्या न्यायालयात त्यांच्यावर हजारो कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणी आरोप ठेवण्यात आलेले आहेत. खरंतर ते तुरुंगात असायला हवेत, पण सरकार त्यांना वाचवत आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *