उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसांच्या नवी दिल्ली भेटीत अनेक महत्त्वाच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या व त्याची छायाचित्र प्रसिद्धीस दिली. पण एक छायाचित्र त्यांनी प्रसिद्धीस का दिले नाही, याची चर्चा रंगली आहे.उपमुख्यमंत्रीपदी फेरनिवड झाल्यावर अजित पवारांनी दिल्ली गाठली. तशाही अजित पवारांच्या दिल्ली भेटी अलीकडे वाढल्या आहेत. गेल्याच आठवड्यातील त्यांची दिल्ली भेट अशीच वादग्रस्त ठरली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी प्रतीक्षा करावी लागल्याचे बोलले गेले. अर्थात, अजित पवारांनी त्यांची नंतर खुलासाही केला होता. लागोपाठ दुसऱ्या आठवड्यात अजित पवारांनी दिल्लीचा दौरा केला. या भेटीत त्यांनी उपराष्ट्रपती जददिप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटी घेऊन त्याची छायाचित्रे ‘एक्स’ या समाज माध्यमावर प्रसिद्धीस दिली. याबरोबरोबरच त्यांनी दिल्लीत आणखी एक महत्त्वाची भेट घेतली. पण त्याची फारशी वाच्यत केली नाही. ही भेट म्हणजे आपले काका शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी घेतलेली भेट. अजित पवार, खासदार सूनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांनी शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पण या भेटीची छायाचित्रे अजित पवारांनी प्रसिद्धीस देण्याचे किंवा ‘एक्स’ या समाज माध्यमावर प्रसिद्धीस देण्याचे टाळले. आता त्याचे कारण काय हे अजित पवारांनाच माहित. अजित पवारांनी ‘एक्स’ वरून शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या पण त्याबरोबर काकांचे जुने छायाचित्र प्रसिद्ध केले आहे.मोदी, शहा किंवा धनखड यांच्या भेटीची छायाचित्रे प्रसिद्ध करणाऱ्या अजित पवारांनी आपले काका व राजकारणातील गुरू शरद पवार यांचेच नेमके छायाचित्र प्रसिद्धीस देण्याचे टाळले. आता हे नजरचुकीने झाले की जाणीवपू्र्वक याचा खुलासा होणे कठीण आहे. पण आपण शरद पवारांच्या पुन्हा जवळ जात आहोत हे चित्र पुन्हा निर्माण होऊ नये वा भाजप नेत्यांची तशी धारणा होऊ नये या उद्देशानेच अजित पवारांनी शरद पवारांच्या भेटीला फारसे महत्त्व दिलेले दिसत नाही.लोकसभा व विधानसभा निवडणूक प्रचारात काका-पुतण्यात कमालीची कटुता निर्माण झाली होती. त्यातच पत्नी सूनेत्रा यांचा बारामती सुप्रिया सुळे यांनी केलेला पराभव अजितदादांना फारच जिव्हारी लागला होता. बारामती विधानसभा मतदारसंघातील प्रचारातही काका-पुतण्याने परस्परांवर हल्ले चढविले. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी काकांपासून थोडे दूर राहणेच पसंत केलेले दिसते. भाजप नेत्यांच्या आशीर्वादामुळेच अजित पवारांच्या पत्नी सूनेत्रा पहिल्यांदाच राज्यसभेवर निवडून येऊनही त्यांना शरद पवारांच्या बंगल्याजवळ दिल्लीत घर मिळाले आहे. वास्तविक ११, जनपथ या बंगल्याचे मंत्री वा ज्येष्ठ सदस्यांना वाटप केले जाते.