वसई-विरार (विनायक खर्डे) : वसई-विरार महानगरपालिकेच्या महासभेत अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. या महासभेचे 39 विषयावर चर्चा होणार होती. सुरुवातीपासून भाजपा नगरसेवक व बविआ नगरसेवक यांच्यात धुसपुस चालली होती. सुरुवात भाजपच्या दोन नगरसेवकांनी मनपा च्या आरोग्य विभागातील भ्रष्टाचाराच्या पोस्टरचा पेहराव करत सभागृहात प्रवेश केला यांवर महापौरांनी असे प्रकार कराल तर घरी बसवले जाईल अशी सक्त ताकीद दिली. त्यामुळे भाजपा गटात वातावरण तापलेलेच होते. त्यातच बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या बाबतीत श्रेयवादावर झालेल्या नारेबाजीत विरोधी पक्ष नेता मनोज पाटील यांनी बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांच्यावर टिप्पणी केली असता बविआ चे नगरसेवक संतप्त झाले व अचानक प्रकरण तापले, थेट हाणामारीपर्यंत पोहोचल्याने महापालिका इतिहासात पहिल्यांदाच असा प्रकार घडल्याची चर्चा रंगली आहे.
भाजपचे नगरसेवक मनोज पाटील यांच्या वक्तव्यामुळे सभागृहात तणाव निर्माण झाला. त्यांच्या विधानावर बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवकांनी तीव्र आक्षेप घेत संताप व्यक्त केला. काही सदस्यांनी आपली जागा सोडून थेट भाजप सदस्यांकडे धाव घेतल्याने वातावरण अधिकच चिघळले.
या गोंधळात भाजप गटनेते अशोक शेळके आणि बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवकांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली. या घटनेमुळे प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विकासकामांवर सखोल चर्चा होणे अपेक्षित असताना लोकप्रतिनिधींमधील अशा वादामुळे सर्वसामान्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, तणाव नियंत्रणात आणण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने काही वेळासाठी सभा स्थगित करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
या प्रकारामुळे वसई-विरारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून, संबंधितांवर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.