मीरा-भाईंदरमध्ये चैत्र नवरात्रोत्सवाचा जल्लोष; दक्षिणात्य मंदिराचा भव्य देखावा भाविकांचे आकर्षण

मीरा-भाईंदर, प्रतिनिधी : आश्विन नवरात्रीप्रमाणेच चैत्र नवरात्रीलाही मीरा-भाईंदर शहरात मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. प्रताप सरनाईक फाउंडेशनतर्फे आयोजित ‘दिव्य चैत्र नवरात्र उत्सव २०२६’चा दिमाखदार शुभारंभ झाला असून, शहरात सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सहकुटुंब आदिमाया शक्तीची विधिवत स्थापना केली. ‘शैलपुत्री’ देवीच्या पूजनाने या नऊ दिवसीय उत्सवाला प्रारंभ झाला. मंत्रोच्चार, आरती आणि जयघोषामुळे परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
दक्षिणात्य मंदिराचा देखावा ठरतोय आकर्षणाचा केंद्रबिंदू
गेल्या चार वर्षांपासून भव्यतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या या उत्सवाचे यंदा पाचवे वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही वेगळी संकल्पना साकारण्यात आली असून, दक्षिणात्य स्थापत्यशैलीवर आधारित भव्य मंदिराचा देखावा उभारण्यात आला आहे. नक्षीकाम केलेले स्तंभ, उंच गोपूर आणि आकर्षक सजावट यामुळे भाविकांना दक्षिण भारतातील मंदिरांचा प्रत्यक्ष अनुभव मिळत आहे.
नऊ दिवसांत देवीच्या नऊ रूपांची आराधना
चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून सुरू झालेल्या या उत्सवात पुढील नऊ दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाणार आहे. ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धीदात्री या रूपांचे पूजन, भजन आणि विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले, “चैत्र नवरात्री हा श्रद्धा आणि भक्तीचा उत्सव आहे. आई जगदंबेची कृपा सर्वांवर राहो आणि नागरिकांचे जीवन सुख-समृद्धीने भरून जावो, हीच प्रार्थना.”
दरम्यान, मीरा-भाईंदरमधील भाविकांनी या दिव्य नवरात्रोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *